अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड तसेच हॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा आई झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. आम्ही पालक झालो असून मला खूप आनंद झाला आहे, असं म्हणत आपण आई झाल्याचं प्रियंकाने जाहीर केलंय. प्रियंका चोप्राने 2018 साली गायक निक जोनाससोबत लग्न केलं होतं. पालक होण्यासाठी या दोघांनी सरोगसीचा पर्याय निवडलेला आहे. प्रियंकाने शुक्रवारी रात्री याबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये प्रियंका चोप्राने आई होण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लगेच सरोगसीद्वारे आपण आई झाल्याचे प्रियंकाने जाहीर केले आहे. “आम्ही नुकतेच बाळाचे स्वागत केल असून आम्ही खूप आनंदी आहोत. सध्या आम्ही आमच्या कुटुंबाकडे लक्ष केंद्रित करत आहोत. त्यामुळे अशा विशेष क्षणी आम्हाला खासगीपणा जपण्याची गरज आहे,” असे प्रियंकाने इन्स्टाग्रामद्वारे सांगितले आहे.
प्रियंका चोप्रा सरोगसीद्वारे आई झाली आहे. याबाबतचा संदेश प्रियंका चोप्राने दिला आहे. तसेच वडील झाल्याच्या बातमीला निक जोनासनेदेखील पुष्टी दिलेली आहे. मात्र, जन्माला आलेलं बाळ मुलगा आहे की मुलगी हे दोघांनीही आद्यापतरी सांगितलेले नाही. दरम्यान, टीएमझेड या वृत्त संकेतस्थळाने प्रियंकाला मुलगी झाल्याचे सांगितलेले आहे. मात्र यावर अजूनतरी शिक्कामोर्तब झालेले नाही.